सचिन खुटवळकर : फुटबॉल हे राजकीय हितसंबंध सुधारण्याचे माध्यम असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेच द्यावे लागेल. फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत.
रशियामध्ये फुटबॉल सामने पाहण्यासाठी विविध देशांतील फुटबॉलप्रेमींसह वजनदार नेतेही रशियाला भेटी देत आहेत. याचा फायदा राजकीय हितसंबंध सुधारण्यासाठी उठविण्यात पुतिन यशस्वी ठरत आहेत. सौदी अरेबिया, कोरिया, इराण आदी देशांचे ताकदवान नेते रशियाच्या भेटीवर आहेत. या सर्वांशी सलोखा साधत पुतिन यांनी आपण किती ‘मुरलेला’ खेळाडू आहे याची प्रचीती आणून दिली. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर पुतिन यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी रशियात फुटबॉल ज्वर शिगेला पोहोचलेला असून त्या माध्यमातून एक बलाढ्य देश म्हणून आपली प्रतिमा अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात रशियन मुत्सद्दी आहेत.
आउट आॅफ द फुटबॉल - दुसऱ्या महायुद्धानंतर १९५४ साली खेळविण्यात आलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेकडे जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा एक उपक्रम या नजरेतूनच पाहिले गेले.- फुटबॉल वेड जगभरात दिसून येते. अनेक देशांनी सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या आयोजनांवर भर दिला. आश्चर्य म्हणजे, या देशांना त्याचा अनुकूल फायदाही झाला.- युरोपियन समुदायात स्थान मिळविण्यासाठी जर्मनीने आखलेल्या मोहिमेत फुटबॉल हा एक महत्त्वाचा दुवा होता. दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या देशासह आफ्रिका खंडाला जगाच्या नजरेत आणण्यासाठी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पेलली.- सर्वात मोठा क्रीडा प्रकार म्हणून पसंती असलेला फुटबॉल एक धर्मच बनला आहे. स्वत: एक उत्तम क्रीडापटू असलेले पुतिन या माध्यमातून रशियाचा कसा फायदा होईल यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत.- इसिससारख्या अतिरेकी संघटनांचा संभाव्य धोका मोडून काढण्याची सर्व सज्जता रशियन सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. एकूणच ‘राजकीय गोल’ साधण्यासाठी रशिया व पुतिन जोरकस प्रयत्न करत आहेत.