मॉस्को - रविवारी आटोपलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत सर्वार्थाने संस्मरणीय ठरली. या लढतीत फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 ने मात करत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एकूण सहा गोल नोंदवले गेले. फिफा विश्वचषकाच्या अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर प्रथमच 4 पेक्षा अधिक गोल नोंदवले गेले. मॉस्को येथे रविवारी रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत गोलचा पाऊस पडला. विजेत्या फ्रान्सने 4 तर उपविजेत्या क्रोएशियाने दोन गोल केले. त्यामुळे एकूण सहा गोलांसह या लढतीत एक नवा विक्रम नोंदवला गेला. याआधी 1986 साली अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत एकूण 5 गोल नोंदवण्यात आले होते. त्यावेळी अर्जेंटिनाने पश्चिम जर्मनीला 3-2 अशा फरकाने मात दिली होती. तर 1982 च्या विश्वचषकात इटलीने पश्चिम जर्मनीवर 3-1 ने मात केली होती. फिफा विश्वचषक स्पर्धेतील इतिहासाचा विचार केल्यास आतापर्यंत एकूण 11 वेळा अंतिम लढतीत 4 किंवा त्यापेक्षा अधिक गोल झाले आहेत. 1930 साली झालेल्या पहिल्या विश्वचषकात अंतिम लढतीत 6 गोल नोंदवले गेले होते. त्यावेळी उरुग्वेने अर्जेंटिनावर 4-2 ने मात केली होती. त्यानंतर 1938, 1954, 1958, 1962, 1966, 1970, 1978, 1982 आणि 1986 च्या विश्वचषकात अंतिम लढतीत 4 हून अधिक गोलची नोंद झाली होती.
FIFA Football World Cup 2018 : अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर घडला असा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:55 AM