ठळक मुद्देपंचांनी सर्व खेळाडूंना शांत करत मॅब्प्पे आणि रॉड्रीगेज दोघांना पिवळे कार्ड दाखवले.
निझनी नोव्हगोरोड : फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. काहींच्या मनात अशी भिती दाटू लागली की, सुआरेझ आता फ्रान्सच्या खेळाडूचा चावा घेणार की काय... फ्रान्स आणि उरूग्वे यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 63व्या मिनिटाला सामन्यात गरमागरमीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही संघातील खेळाडू अक्षरश: एकमेकांवर धावले. यात उरूग्वेच्या लुईस सुआरेझचा पारा सर्वाधिक चढलेला पाहायला मिळाला. त्यामुळे त्याच्याकडून 2014 च्या विश्वचषक स्पर्धेतील कृत्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. सामन्याच्या 61व्या मिनिटाला फ्रान्सने आणखी एक गोल करून सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पिछाडीभरून काढण्यासाठी उरूग्वेने आक्रमणाला सुरूवात केली. 63व्या मिनि़टाला फ्रान्सचा कायलिन मॅब्प्पे आणि उरूग्वेच्या ख्रिस्टीयन रॉड्रीगेज यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्यावरून वाद झाला. त्यात मॅब्प्पे जमिनीवर कोसळला, परंतु मॅब्प्पे वेळ वाया घालवण्यासाठी हे नाटक करत असल्याचा दावा उरूग्वेकडून करण्यात आला. मॅब्प्पेला उठवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रॉड्रीगेजवर फ्रान्सचे खेळाडू धावले. त्यानंतर क्षणात दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांच्या दिशेने धावले. फ्रान्सच्या पॉल पोग्बाने तर एका खेळाडूच्या मानेवर फटका मारला. सुदैवाने पंचांनी तो पाहिला नाही. या सगळ्या घडामोडीत लुईस सुआरेझ प्रचंड वैतागलेला पाहायला मिळाला. पराभवाचे मळभ डोक्यावर असताना फ्रान्सकडून खेळल्या जात असलेल्या रडीच्या डावाने त्याचा पारा चढत होता. त्यामुळे त्याच्याकडून 2014च्या विश्वचषक स्पर्धेतील चावण्याच्या त्या कृत्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भिती वाटू लागली होती.पंचांनी सर्व खेळाडूंना शांत करत मॅब्प्पे आणि रॉड्रीगेज दोघांना पिवळे कार्ड दाखवले.