मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. पण या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे.
सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबने मोरॅक्कोसाठी पहिला गोल केला. त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनने त्यांच्यावर यशस्वी हल्ला चढवला. स्पेनच्या इस्कोने 19व्या मिनिटाला गोल केला आणि सामना मध्यंतरापर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला.
दुसऱ्या सत्रात मोरॅक्कोने आक्रमक खेळ केला. मोरॅक्कोच्या इन नेसयारीने गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मोरॅक्कोच्या या गोलनंतर स्पेनचा संघ खडबडून जागा झाला. त्यांनी भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला गोल करत सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली. स्पेनसाठी हा निर्णायक गोल इअॅगो अॅसपसने केला.