सचिन खुटवळकर : सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंच्या आहार, जीवनशैली, व्यायाम व कामगिरीवर चर्चा झडत आहे. त्याचबरोबर काही खेळाडू व प्रशिक्षकांची अंधश्रद्धाही तितकीच चर्चेचा विषय ठरत आहे. कोणाला जुन्या कपड्यांचा मोह सोडवत नाही, तर कोणी सामना सुरू होण्यापूर्वी नेहमीची विशेष कृती करण्यात कसर ठेवत नाही. हे सगळे अंधश्रद्धेपोटी घडत असले, तरी त्यामागचा उद्देश शुद्ध असतो. आपली कामगिरी चांगली व्हावी व संघाला त्याचा फायदा व्हावा, असा हेतू ठेवून खेळाडू अंधश्रद्धा बाळगताना दिसतात.
फुटबॉलपटूंच्या अंधश्रद्धेला खूप मोठी परंपरा आहे. कोलंबियन गोलरक्षक रेने हिगुएटा हा यात आघाडीवर होता. निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र वापरल्यामुळे आपला संघ चांगली कामगिरी करतो, यावर त्याचा गाढ विश्वास होता. त्यामुळे फुटबॉल खेळू लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत त्याने निळ्या अंतर्वस्त्राचा कटाक्षाने वापर केला. असे अनेक किस्से फुटबॉल जगतात चर्चेत असतात. सध्या रशियात सुरू असलेली स्पर्धाही त्याला अपवाद नाही. काही गोष्टी योगायोगाने जुळून येत असल्या, तरी एखाद्या खेळाडूला त्या वेळी तो शकुन वाटतो आणि त्या गोष्टी त्याच्या सवयीचा भाग बनतात. भलेही त्याला अंधश्रद्धाळू म्हणून हिणवले गेले, तरीही!
याबद्दल आश्चर्य नको...- जर्मनीचा स्ट्रायकर मारियो गोमेझ याची अंधश्रद्धा काहीशी हास्यास्पद आहे. मैदानात उतरण्यापूर्वी तो अगदी डाव्या बाजूला असणाऱ्या युरिनलचा वापर करतो.- गोमेझचा संघसाथी ज्युलियन ड्राक्सलर हा विशिष्ट वासाचे दोन-तीन परफ्युम मारूनच सामन्यासाठी सज्ज होतो. अर्थात ही त्याची अंधश्रद्धा असून परफ्युमचा आणि सामन्यादरम्यान येणाऱ्या घामाच्या वासाचा काहीही संबंध नसल्याचे त्याचे संघसहकारी गमतीने सांगतात.- इंग्लंडचा गेले अली ११व्या वर्षापासून एकच शीन गार्ड (पायावरील आवरण) वापरतो. त्याचाच सहकारी फिल जोन्स मैदानावरील पांढऱ्या रेषेवर पाय टाकायचे नेहमीच टाळतो. खेळकर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला ब्राझिलचा मार्सेलो मैदानात जाताना पांढऱ्या रेषेवरून उजवे पाऊल आधी टाकतो. ही कृती अनेक फुटबॉलपटू करताना दिसतात.- २0१२ साली आफ्रिका चषक स्पर्धेत झांबियाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर मोरोक्कोचे प्रशिक्षक हर्व रेनार्ड प्रत्येक सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचाच शर्ट परिधान करतात.