मॉस्को : स्वित्झर्लंडला फुटबॉल विश्वचषकातील सामन्यात कोस्टारिकाबरोबर 2-2 अशी बरोबरी स्वीकारावी लागली, पण तरीही त्यांनी बाद फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे.
स्वित्झर्लंडच्या ब्लेरिम डेमेलीने 31व्या मिनिटाला कोस्टा रिकाच्या गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र खेळ अधिक आक्रमक झाला. कोस्टारिकाच्या केंडल वॉटसनने सामन्याच्या 56व्या मिनिटाला गोल केला आणि त्यांनी सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.
कोस्टारिकाने बरोबरी केल्यावर स्वित्झर्लंडच्या संघाने आक्रमणावर भर दिला, पण त्यांना गोल करण्यात यश आले ते सामन्याच्या 88व्या मिनिटाला. स्वित्झर्लंडच्या जोसिप ड्रीमिकने सामन्याच्या 88व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. स्वित्झर्लंड आता सामना जिंकेल, असे वाटत होते. पण स्वित्झर्लंडच्याच यान सोमरने भरपाई वेळेच्या तिसऱ्याच मिनिटाला आपल्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण या बरोबरीनंतरही स्वित्झर्लंडने बाद फेरी गाठली आहे.