सचिन कोरडे : फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत खेळ. यंदाच्या विश्वचषकात तर बक्षिसांची खैरात वाटली जाणार... मेस्सी, रोनाल्डो यासारखे खेळाडू तर जगातील श्रीमंतांच्या यादीत आहेत; कारण या खेळाला जगभरात मोठे ग्लॅमर आहे. त्यामुळेच खेळाडूंची मोठी ‘चांदी’ होते. कुणी सोन्याचे बूट वापरतो तर कुणी टीशर्ट्स. आता ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारही चर्चेत आहे. संघ हॉटेलमधून बाहेर पडला तेव्हा छायाचित्रकारांच्या नजरेतून नेमारची गोल्डन बॅग मात्र सुटली नाही. ७०० पाउंड किमतीच्या या सोनेरी बॅगेत नेमकं दडलयं तरी काय?
शुक्रवारच्या सामन्यात पाच वेळचा विश्वचॅम्पियन ब्राझील स्पर्धेतून बाद झाला. बेल्जियमने अनपेक्षित असा निकाल दिला. ब्राझीलवर फुटबॉल जगताच्या नजरा होत्या. त्यामुळे ब्राझीलचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. हा पराभव ब्राझीलवासीयांना प्रचंड दु:ख देणारा ठरला. त्यामुळे त्यांचा स्टार खेळाडू नेमार हा टीकेचे लक्ष्य बनला. स्पर्धेत फिट नसल्याच्या कारणावरूनही त्याच्यावर टीका होत गेली. त्याच्या प्रदर्शनावर नाराजी व्यक्त झाली. केवळ एकच गोल नेमारच्या नावे पडला. संघ मायदेशी परतण्यासाठी निघाला असताना नेमार आपल्या खांद्यावर सोन्याची बॅग घेऊन जातानाचे चित्र व्हायरल होत आहे. नेमारच्या खांद्यावर असलेली बॅग ७०० पाउंड्स किमतीची आहे. ही बॅग नेमारसाठी खास आहे. स्पेशल विश्वचषकासाठी त्याने ही बॅग बनवली होती. या बॅगेवर नेमारच्या आईवडील आणि मुलाचे छायाचित्र आहे. ब्राझीलच्या २६ वर्षीय स्टार खेळाडूने पराभवानंतर चाहत्यांची माफी मागितली. त्याने इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करताना म्हटलेय, ‘मी एवढेच सांगू शकतो की माझ्या आयुष्यातील हा सर्वात दु:खद क्षण आहे.’