नवी दिल्ली - काल झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपान्त्य लढतीत क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 च्या फरकाने पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. 15 जुलै रोजी क्रोएशिया आणि बलाढ्य फ्रान्स यांच्यामध्ये जेतेपदासाठी लढत होईल. क्रोएशियाने पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. इंग्लंडबरोबर झालेल्या सामन्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये क्रोएशियाच्या संघाने विजय साजरा केला. यावेळी त्यांनी डान्सही केला. विषेश म्हणजे, संघाच्या विजयी सेलिब्रेशनमध्ये क्रोएशियाच्या राष्ट्रपतीही सहभागी झाल्या होत्या. खेळाडूंसोबत राष्टपतींनीही ठेका धरला होता. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाच्या राष्ट्रपती कोलिंडा ग्रेबर कित्रोविक चांगल्याच चर्चेत राहिल्या. सामने पाहण्यासाठी चार्टेर प्लेनने येऊ शकणाऱ्या कोलिंडा इकॉनोमी क्लासने आल्या. सर्वसामान्या लोकांसोबत त्यांनी फूटबॉल विश्वचष्काचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य लोकांशी संवाद तर साधलाच शिवाय मनोसोक्त सेल्फीही काढल्या.
कोलिंडा ग्रेबर कित्रोविक क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. VVIP असूनही त्या सर्वसामान्य व्यक्तीसारख्या राहत असतात. फीफा विश्वचषकातही त्यांचा हाच अंदाज पहायला मिळाला. आपला संघ अंतिम फेरीत पोहचल्याने खेळाडूसोबत त्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्या बेफिकीर होऊन खेळाडूंसोबत आनंदात सहभागी झाल्या.