- ललित झांबरे
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून आफ्रिकेतील पाचही संघ कधीच बाद झालेले असले तरी स्पर्धेत आफ्रिकन चमक मात्र कायम आहे. त्याचे कारण अंतिम फेरीत धडक मारलेल्या फ्रेंच संघातील आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची संख्या. या 23 सदस्यीय संघात एक-दोन नाहीत तर तब्बल 14 खेळाडू आफ्रिकन वंशाचे आहेत. त्यामुळे फ्रेंच संघाचे वर्णनच ‘लास्ट रिमेनिंग आफ्रिकन टीम इन वर्ल्ड कप’ असे करण्यात येत आहे.
उपांत्य फेरीत बेल्जियमवर विजय मिळवताना फ्रेंच व्यवस्थापनाने आपल्या संघातील आफ्रिकन वंशाच्या 14 पैकी सात खेळाडूंना मैदानात उतरवले होते. यात एमबाप्पे, पॉल पोग्बा या स्टार खेळाडूंसह फ्रान्ससाठी विजयी गोल करणारा सॅम्युअल उमटिटी, ब्लेईस मातुैदी, एन्गोलो कान्ते, स्टिव्हन एन्झोझी आणि कोरेंटीन तोलिस्सो यांचा समावेश होता.
योगायोगाने याच सामन्यासाठी फ्रान्सच्या प्रतिस्पर्धी बेल्जियमच्या संघातही सहा आफ्रिकन वंशाचे खेळाडू (व्हिन्सेंट कोम्पनी, फेलैनी, रोमेलू लुकाकू, मुसा देंबेले, मिची बात्शायी आणि नासेर चॅडली) खेळले. या प्रकारे उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यातील दोन्ही संघ युरोपियन असले तरी त्यांच्याकडून एकूण 13 आफ्रिकन वंशाचे खेळाडू खेळले.
एवढेच नाही तर इंग्लंडच्या संघातही डेले अली (नायजेयिन वंशी) आणि डॅनी वास्बेक (घाना वंशी) हे दोन मुळचे आफ्रिकन खेळाडू आहेत.यंदा उपांत्य फेरी गाठलेल्या चार संघांपैकी केवळ क्रोएशिया हा एकच संघ असा आहे ज्यात आफ्रिकन खेळाडू आहे. इतर तीन संघापैकी फ्रेंच संघात १४, बेल्जियन संघात ८ आणि इंग्लंडच्या संघात २ आफ्रिकन खेळाडू आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल्स आॅल युरोपियन संघात असल्या तरी हे संघ युरोपियन म्हणावेत कसे , हा प्रश्न आहे.
यंदाचा विश्वचषक हा १९८२ नंतरचा पहिलाच असा विश्वचषक आहे की ज्यात एकही आफ्रिकन संघ पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारू शकला नाही. इजिप्त, सेनेगल, मोरोक्को, ट्युनिशिया आणि नायजेरिया हे पाचही आफ्रिकन संघ यंदा गटवार साखळीतच बाद झाले.
त्यानंतर फ्रेंच संघातील आफ्रिकन खेळाडूंची मोठी संख्या पाहता फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नायजेरिया भेटीत आवाहनच केले होते की आता फ्रेंच संघाला नायजेरियन फुटबॉल प्रेमींचे समर्थन मिळायलाच पाहिजे. एकप्रकारे आफ्रिकन खेळाडूंवर फ्रान्सचे यशापयश अवलंबून असल्याची ही जाहीर कबुलीच होती. त्यामुळे आता फ्रान्सने विश्वविजेतेपद पटकावले तर फ्रान्सएवढाच जल्लोश आफ्रिकेतही होईल अशी चिन्हे आहेत.
फ्रेंच फुटबॉल संघातील आफ्रिकन वंशाचे १४ खेळाडू पुढीलप्रमाणे
१) कायलीयन एमबाप्पे (कॅमेरून/नायजेरिया)
२) पॉल पोग्बा (गिनिया)
३) स्टिव्ह मंदादा (कांगो)
४) ब्लेईस मातुैदी (अंगोला/ कांगो)
५) एन्गोलो कांते (माली)
६) ओस्मान देंबेले (सेनेगल/माली)
७) नाबील फकीर (अल्जेरिया)
८) सॅम्युएल उमटिटी (कॅमेरून)
९) अदिल रामी (मोरोक्को)
१०) बेंजामीन मँडी (सेनेगल)
११) जिब्रील सिदीबे (सेनेगल)
१२) प्रेस्रेल किंपेंबे (कांगो)
१३) स्टिव्हन एन्झोझी (कांगो)
१४) कोरेंटीन टोलिस्सो (टोगो)