सोची - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनासाठी कर्दनकाळ ठरलेल्या फ्रान्सच्या त्या खेळाडूला लिओनेल मेस्सीचे चाहते शिव्याशाप देत असतील. मात्र त्याचे सामाजिक कार्य ऐकल्यास हीच विरोधातील मंडळीही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू आपले संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान करत आहे .अर्जेंटिनाविरूद्धच्या लढतीत दोन गोल करणारा कायलीन मॅब्प्पे फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. पेले यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले, तर अर्जेंटिनाचे पाठिराखे त्याच्यावर प्रचंड नाराज झाले. मात्र त्याचे समाजकार्य ऐकल्यानंतर त्यांच्याही मनाला पाझर फुटेल. पॅरिसमध्ये 1998मध्ये जन्मलेला हा खेळाडू लीग वनमध्ये पॅरीस सेंट-जर्मेन संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि तो जगातील दुसरा महागडा युवा खेळाडू आहे. मात्र श्रीमंतीचा जराही माज न करता समाजाप्रती आपण देणे लागतो, याची जाण त्याने ठेवली आहे. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणा-या संस्थेला तो विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात मिळणारे संपूर्ण मानधन दान करतो.
मॅब्प्पेला एका सामन्यासाठी 16 लाख मानधन मिळत आहे.