ललित झाम्बरे
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य ब्राझीलला रविवारी स्वीत्झर्लंडने बरोबरीत रोखल्यावर सोशल मिडीयावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याच्यावरून विनोदांची आणि मेमेंची बरसात होत आहे. त्या फोटोत ब्राझीलचा गोलरक्षक अॅलीसन बेकर हा स्वीत्झर्लंडच्या राष्ट्रध्वजाच्या रंगातील चेंडूसारख्या एका फुग्याला क्षणाचाही विलंब न लावता लाथेने फोडताना दिसतोय. सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला हा प्रकार घडला आणि नंतर योगायोगाने ब्राझीलला हा सामना जिंकण्यात अपयश आले.
स्वीत्झर्लंडने त्यांना १-१ असे बरोबरीत रोखले. विश्वचषकात ४० वर्षात प्रथमच ब्राझीलला त्यांचा पहिला सामना जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे अॅलीसन बेकरच्या या चेंडू फोडण्याचा कृृतीची ब्राझीलच्या निराशेसोबत सांगड घालून सोशल मिडीयावर गमतीशीर कॉमेंटस् आणि मेमेंची बहार आली आहे. आता ब्राझील आणि अॅलीसनचे समर्थक या कृत्याच्या समर्थनासाठी लिव्हरपूलचा गोलरक्षक पेपे रिनाचा दाखला देत आहेत. २००९ मध्ये एका सामन्यात अशाच एका चेंडृूमुळे रिनाचे लक्ष विचलीत झाले होते आणि त्यामुळे लिव्हरपूलने तो सामना गमावला होता. तसे पुन्हा होऊ नये यासाठी ही एकप्रकारची अॅलीसनची चाचणीच होती असे सांगण्यात येत आहे मात्र ते फुटबॉलप्रेमींना पटलेले नसून त्यांना जो संताप अॅलीसनच्या कृत्यात दिसृन आला तो त्यांनी सोशल मिडियावर विविध विनोद आणि मेमेंद्वारे जाहीर केला आहे.