चिन्मय काळेफुटबॉल विश्वचषक स्पर्धेत दोनच दिवसांपूर्वी नवख्या आईसलॅण्डने गतउपविजेत्या अर्जेंटीनाला बरोबरीत रोखल्याची कमाल केली. युरो चषकातच आईसलॅण्डने असा धमाकेदार खेळ केल्याने त्यांचा संघ रशियात धमाल करेल, असा अंदाज होताच. मेक्सिकोनेही जर्मनीला नमवत सर्वात मोठा धक्का दिला. स्वीत्झर्लंडने ब्राझीलला रोखले. त्याच श्रेणीत आता मेक्सिकोचा शेजारी असलेला ‘पनामा’ आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. बेल्जियमसमोर पनामाचे आव्हान असेल.
फुटबॉल विश्वात ‘कॅराबियन’ देश वेगळी धूम करतात. मेक्सिकोचा संघ जवळपास प्रत्येक विश्वचषात पात्र ठरतो व समोरच्या संघाच्या नाकी नऊ आणतोच. कधी होंडूरास, कधी कोस्टा रिका, कधी इक्वेडोर, कधी त्रिनीदाद-टॅबॅगो तर कधी जमैका यांचाही यात समावेश आहे. हे कॅरिबयीन देश मुळात संस्कृतीने अत्यंत वेगळ्या धाटणीचे आहेत. शरीराने धडधाकट असल्याने येथील खेळाडू मैदानी खेळात कायम अग्रेसर असतात. मग शारिरीक क्षमतेची कस लागणाऱ्या फुटबॉलपासून हे देश वेगळे कसे असतील? यामुळेच यंदा पहिल्यांदाच विश्वचषकात पात्र झालेला ‘पनामा’ धक्का देऊ शकतो.
पनामाने विश्वचषक पात्रता फेरीत मेक्सिकोसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. याखेरीज स्पर्धेत पात्र होताना त्यांच्या संघाने होंडूरास, अमेरिका व त्रिनीदाद-टॅबॅगो यासारख्या आधी विश्वचषकात पात्र ठरलेल्या संघांनाही नमवले आहे. संघाचे कोलंबियन प्रशिक्षक हर्नेन गोमेझ यांच्या नेतृत्त्वात याआधी कोलंबिया व इक्वेडोर या दोन्ही संघांनी विश्वचषक स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे. यामुळेच ‘पनामा’ त्यांच्या विश्वचषक प्रवासाची सुरूवात फुटबॉल विश्वाला धक्का देत करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विश्वचषक पात्रता फेरीत १० पैकी ९ सामने जिंकल्याने आंतरराष्ट्रीय बेटींग तज्ज्ञ सध्या बेल्जियमचेच पारडे जड असल्याचे मानत आहेत. पनामा जिंकल्यास १०० डॉलरवर २००० डॉलर्स मिळणार आहेत. हाच दर बेल्जियम जिंकल्यास फक्त ६५० आहे. पण एकंदर या विश्वचषकात छोट्या संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता ‘पनामा’ चा सामना औत्सुक्याचा ठरेल.