सचिन कोरडे : ‘सांबा स्टार’ म्हणून ओळखला जाणारा ब्राझीलचा सर्वात महागडा खेळाडू नेमार सध्या दुखापतग्रस्त आहे. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या चाहत्यामध्ये आणि संघात चिंतेचे वातावरण आहे. फिफा विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात स्विर्त्झलँडविरुद्ध खेळताना नेमारच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखपातीमुळे त्याला खूप वेदना होत होत्या. असे असतानाही तो संपूर्ण सामना खेळला. मात्र सामन्यात नेमार झाकोळला गेला होता. स्विर्त्झलंडने नेमारला जायबंदी करत ब्राझीलला मोठा झटका दिला आहे. आता शुक्रवारी कोस्तारिकाविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये चिंता पसरली आहे.
नेमार याने स्वत: व्हॉट्सअप स्टेटसवर दुखापतीचे छायाचित्र पोस्ट केले. या छायाचित्रात त्याने आपल्या पायाला झालेल्या दुखापतीकडे लक्ष वेधले आहे. पायावर उपचार सुरु असल्याचेही दिसते. मात्र आपण लवकरच ठिक होणार. वर्क हार्ड..असा सांगत पुढील सामन्याचे संकेतही दिले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात नेमाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून तो सावरला होता. दुखापतीनंतर तो केवळ १२९ मिनिटेच मैदानावर खेळला होता. विश्वचषकासाठी त्याने तयारी केली होती. पहिल्याच सामन्यात स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी नेमारला टार्गेट केले. ब्राझीलचा हा जर्सी नंबर- १० चा खेळाडू संघासाठी अंत्यत महत्वाचा आहे. अशा स्थितीत नेमारची दुखापत ही ब्राझील समर्थकांत चिंता वाढवणारी आहे.
ब्राझील पाच वेळचा चॅम्पियन संघ आहे. तसेच नेमारचे ध्येय हे यंदाचा विश्वचषक जिंकण्याचे आहे. त्याने गेल्या आठवड्यात ५५ वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला होता. आता तो ब्राझीलच्या रोमारियोची (६२) बरोबरी साधण्याकडे वाटचाल करीत आहे.