मॉस्कोः जगातील सार्वकालिक महान फुटबॉलपटूंच्या यादीत विराजमान असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोनं फिफा वर्ल्ड कपमधील स्पेनविरुद्धच्या सामन्यात आपला करिष्मा पुन्हा दाखवून दिला. 'वन मॅन आर्मी' मानल्या जाणाऱ्या रोनाल्डोनं एकापाठोपाठ एक तीन गोल झळकावून पोर्तुगालचा पराभव टाळला आणि सामना बरोबरीत सोडवला. रोनाल्डोच्या फ्री किकवरच्या गोलनं तर चाहत्यांना पार याड लावलं. पण 'सेम टू सेम' तसाच गोल या 'सुपरमॅन'नं साधारण ९ वर्षांपूर्वीही केला होता. त्याचा व्हिडिओ एका रोनाल्डो फॅननं ट्विटरवरून शेअर केलाय.
५८व्या मिनिटाला स्पेननं तिसरा गोल झळकावला आणि पोर्तुगालचा संघ २-३ असा पिछाडीवर पडला. वेळ पुढे सरकत होता आणि सामना संपायला फक्त चार मिनिटं शिल्लक होती. तेव्हा, फ्री किकच्या रूपाने त्यांना बरोबरी साधण्याची संधी चालून आली आणि रोनाल्डोनं तिचं सोनं केलं. आधीच दोन गोल करून त्यानं आपली जादू दाखवली होती. त्यामुळे अपेक्षांचं फार मोठं ओझं त्याच्यावर होतं. अख्ख्या पोर्तुगालला त्याच्याकडून आशा होत्या. हे ओझं समर्थपणे पेलत त्यानं तिसरा गोल करून या वर्ल्ड कपमधील पहिली हॅटट्रिक साजरी केली. त्याच्या या किकचा वेग होता ताशी १०० किलोमीटर. अवघ्या ०.८२ सेकंदात चेंडू गोलपोस्टच्या जाळीवर आदळला आणि स्टेडियममध्ये एकच कल्ला झाला.
अगदी असाच गोल रोनाल्डोनं प्रीमिअर लीगमध्ये मॅन्चेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना केला होता. २००३ ते २००९ ही सहा वर्षं तो मॅन्चेस्टर युनायटेडचा शिलेदार होता. त्या दरम्यान एका सामन्यात त्यानं अशीच फ्री किक हाणली होती आणि प्रतिस्पर्धी बघत राहिले होते. हा गोल पाहून, ९ वर्षांनंतरही रोनाल्डोची क्षमता - फिटनेस तसूभरही कमी झाली नसल्याची प्रचिती येते.