- चिन्मय काळेमुंबई : जगभरातील फुटबॉलवर युरोपातील धनाढ्य, बलाढ्य व मातब्बर अशा क्लब्सचे आणि त्यानिमित्ताने तेथील देशांच्या संघांचे वर्चस्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. जागतिक फुटबॉल जगतावर कायम वर्चस्व ठेवणाऱ्या या युरोपियन संघाना ‘कट टू कट’ लढा देण्याची हिंमत फक्त ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन दक्षिण अमेरिकन देशांच्या संघांनीच दाखवली आहे. त्यामुळेच फुटबॉल विश्वचषक ही जागतिक स्पर्धा असली तरी ही प्रामुख्याने युरोप विरुद्ध दक्षिण अमेरिका अशीच लढत असते व ती यंदाही आहेच.रशियात गुरूवारी किक-आॅफ होणा-या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर सर्वत्र पसरू लागला आहे. जगातील अव्वल ३२ संघ त्यात सहभागी झाले आहेत. पण जागतिक फुटबॉलमध्ये इंग्लंड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅण्ड्स या देशांमधील क्लब्सची ‘चलती’ आहे. जगभरातील खेळाडू (ब्राझील, अर्जेटीनाचेसुद्धा) या क्लबमध्ये खेळण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. जगभरातील मातब्बर खेळाडू या क्लबचे खेळाडू असतात. यामुळेच फुटबॉल म्हणजे ‘ब्राझील’ हे समिकरण चर्चेत असले तरी वास्तवात फुटबॉलवरील अधिराज्य हे युरोपातील देशांचे असते, हे आजवरच्या इतिहासात कायम दिसून आले आहे. विश्वचषकात पात्र होणा-या संघांपैकी फक्त ब्राझील आणि अर्जेंटीना वगळता अन्य कुठल्याच देशांचे संघ विश्वचषकात युरोपातील मातब्बर संघांना लढा देऊ शकलेले नाहीत.ब्राझीलने पाच वेळा विश्वचषकावर स्वत:चे नाव कोरले आहे. ब्राझीलने जिंकलेल्या या पाचही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विरुद्ध संघ हे युरोपातीलच होते. वास्तवात फुटबॉल जगतात सुरुवातीच्या काळात युरोपियन देश कुठेच नव्हते. केवळ इटलीचा संघ मातब्बर संघांपैकी एक मानला जात होता. ६० व्या दशकापर्यंत अखेरपर्यंत ब्राझील, अर्जेंटिना व उरुग्वे या देशांच्या संघांची फुटबॉल जगतात ‘चलती’ होती. पण इटली, पश्चिम जर्मनी आणि नेदरलॅण्ड्सचे संघ १९७० नंतर जागतिक फुटबॉलवर प्रभावशाली होऊ लागले. त्यामुळे ब्राझीलला १९७० नंतर तब्बल २४ वर्षे विश्वचषकापासून दूर राहावे लागले. १९९४ मध्ये त्यांनी विश्वचषक जिंकला तोही इटली या युरोपियन संघाला नमवूनच. १९९८ च्या विश्वचषकात अंतिम लढतीत युरोपियन यजमान फ्रान्सने ब्राझीलला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर २००२ मध्ये ब्राझीलने पुन्हा चषक ताब्यात घेतला. त्यावेळीही त्यांची अंतिम लढत युरोपातीलच जर्मनीशीच होती. आता सलग तीन विश्वचषक ब्राझीलची कामगिरी जेमतेम राहीली आहे. २००२ नंतरचे तीन विश्वचषक असो वा त्याआधीचे, आजवर ज्या-ज्या विश्वचषकात ब्राझील पराभूत झाला आहे, त्या-त्या विश्वचषकात ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आणणारा संघ हा केवळ युरोपातील राहिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर्मनी (पूर्वी पश्चिम जर्मनी), इटली, नेदरलॅण्ड्स व इंग्लंड यांचा समावेश आहे.हीच स्थिती अर्जेंटिनाची आहे. अर्जेंटिना आज जागतिक फुटबॉल जगतातील मातब्बर संघांपैकी एक असला तरी विश्वचषकाच्या सुरुवातीच्या काळात अर्जेंटिना कमकुवत संघ होता. एकप्रकारे जिथे ब्राझीलचा संघ १९७० नंतर कमकुवत झाला तिथे अर्जेंटिनाने दक्षिण अमेरिकेची झुंज कायम ठेवली. अर्जेंटिनाने १९७८ व १९८६ साली विश्वचषक जिंकला. जी बाब ब्राझीलबाबत तीच अर्जेंटिनाबाबत. १९९० च्या अंतिम सामन्यात तत्कालीन पश्चिम जर्मनीकडून पराभूत होणाºया अर्जेंटीनाची कामगिरी २०१४ पर्यंत सातत्याने खालावत गेली. यादरम्यानच्या काळात अर्जेंटीनाचे आव्हान संपुष्टात आणणारे संघ रुमानिया, जर्मनी व नेदरलॅण्ड्स हे युरोयिपनच होते.१९५० पर्यंत दोन विश्वचषक स्वत:च्या नावावर कोरल्यानंतर उरूग्वेची कामगिरीसुद्धा १९७० पर्यंत चांगली होती. या देशाचा संघ उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण १९७० नंतर युरोपियन संघ फुटबॉल जगतात मातब्बर होऊ लागल्यावर उरूग्वेची कामगिरी खालावत गेली. हा संघ त्यानंतर थेट २०१० च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला.फुटबॉल विश्वचषकात बाद फेरीत १६ देशांचे संघ असतात. या १६ देशांमध्ये कायम ८, कधी १० तर कधी १२ देश हे युरोपातील राहिले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत तर आजवर जवळपास प्रत्येक विश्वचषकात केवळ अर्जेंटिना किंवा ब्राझील हे दोनच दक्षिण अमेरिकन संघ मातब्बर युरोपियन संघांशी एकाकी लढत देताना दिसले आहेत. २००२ मधील तुर्की व दक्षिण कोरिया या दोन संघांचा अपवाद सोडल्यास ब्राझील व अर्जेंटीना चषकातून बाद झाल्यानंतर अनेक विश्वचषकात उपांत्य फेरीतील चारही संघ केवळ युरोपातील राहीले आहेत.यामुळेच हा विश्वचषक असला तरी खरी लढत ही दक्षिण अमेरिका विरुद्ध युरोप अशीच आहे. त्यामध्ये १६ वर्षे विश्वचषकापासून दूर राहीलेला ब्राझील किंवा २२ वर्षे दूर राहीलेला अर्जेंटीनाचा संघ युरोपाच्या वर्चस्वाचा कसा लढा देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर आपल्या ५० वर्षे जून्या पूर्वोतिहासाला उजाळा देत उरूग्वे यंदा मुसंडी मारू शकतो, हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे असेल.
Fifa World Cup 2018 : ही तर युरोप-दक्षिण अमेरिका ‘फाइट’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 4:02 PM