मॉस्को: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी ब्रॉडकास्टर्सनला महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. सामन्याचं प्रक्षेपण करत असताना हॉट महिला प्रेक्षकांना झूम करुन दाखवू नका, अशी तंबी फिफाकडून देण्यात आली आहे. लिंगभेद टाळण्यासाठी फिफाकडून ही सूचना देण्यात आली आहे. अनेकदा सामना सुरू असताना हॉट महिला प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवला जातो. अनेक कॅमेरामन महिलांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी कॅमेरा झूम करतात. ही संपूर्ण दृश्य थेट प्रक्षेपित केली जातात. मात्र आता फिफानं असं चित्रीकरण आणि प्रक्षेपण रोखायचं ठरवलं आहे. त्यामुळे फिफाकडून ब्रॉडकास्टर्सना तंबी देण्यात आली आहे. सामना दाखवत असताना हॉट महिला प्रेक्षकांकडे कॅमेरा झूम करु नका, अशी सूचना फिफाकडून देण्यात आली आहे. फिफाचे जिआनी इन्फेंटिनो यांनी ही सूचना दिली आहे. अशा प्रकारचं कृत्य सहन केलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. चुकीच्या गोष्टींवर फिफाकडून कारवाई केली जाईल, असं जिआनी इन्फेंटिनो म्हणाले. यापुढील फिफाच्या प्रत्येक स्पर्धेत प्रक्षेपणासाठी हाच नियम असणार का, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी भविष्यकाळात तसं होऊ शकतं, असे संकेत दिले. 'अद्याप हे फिफाचं धोरण झालेलं नाही. मात्र भविष्यात यावर नक्की लक्ष केंद्रीत जाईल,' असं जिआनी इन्फेंटिनो म्हणाले. येत्या रविवारी फ्रान्स आणि क्रोएशिया विश्वविजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.
FIFA Football World Cup 2018 : हॉट महिला प्रेक्षकांवर झूम करू नका; फिफाची ब्रॉडकास्टर्सना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 1:42 PM