मॉस्को: फिफा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या ब्राझीलच्या संघाला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बरोबरीत रोखलं. स्वित्झर्लंडनं ब्राझीलला 1-1 असं रोखत सामना बरोबरीत सोडवला. यामुळे फिफा वर्ल्ड कपची सुरुवात विजयानं करण्याची ब्राझीलची संधी हुकली. विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षानंतर ब्राझीलच्या संघाला फिफाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. ब्राझीलचा संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये नेहमीच दमदार कामगिरी करतो. 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1978 मध्ये ब्राझीलला सलामीच्या सामन्यात स्वीडननं 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. यानंतर तब्बल 40 वर्षांनंतर ब्राझीलला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघानं बरोबरीत रोखलं. ब्राझीलनं विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बरोबरी पत्करण्याची ही केवळ तिसरी वेळ ठरली. 1974 च्या विश्वचषकात युगोस्लावियानं ब्राझीलला गोलशून्य बरोबरीत रोखलं होतं. यानंतर 1978 मध्ये स्वीडननं ब्राझीलला 1-1 असं बरोबरीत रोखलं. आता तब्बल 40 वर्षानंतर स्वित्झर्लंडनं ही कामगिरी करुन दाखवली.आतापर्यंत झालेल्या विश्वचषक सामन्यातील ब्राझीलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास ब्राझीलचा संघ 21 विश्वचषक स्पर्धा खेळला आहे. यापैकी 16 स्पर्धांची सुरुवात ब्राझीलनं पहिला सामना जिंकून केली. तर तीनवेळा त्यांना बरोबरीवर समाधान मानावं लागलं. आतापर्यंत दोनवेळा (1930 आणि 1934 मध्ये) ब्राझीलला सलामीच्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे.
Fifa World Cup 2018: तब्बल 40 वर्षानंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये 'असं' घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 1:31 PM