नवी दिल्ली : फिफा विश्वचषकाला रशियातील लुझनिकी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. सुमारे 80 हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली. दरम्यान, या विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमींसह राजकारणी मंडळी उत्सुक आहेत. यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.
देशातील सत्ताधारी भाजपासह कॉंग्रेस, सीपीआय (एम), तृणमूल कॉंग्रेस यासह अनेक पक्षातील राजकीय व्यक्तींनी आपल्या कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे. फिफा विश्वचषकातील आवडता खेळाडू आणि टीमचे सामने कधी आहेत, ते पाहून त्यानुसार आपापल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. तृणमूल कॉंग्रसचे वरिष्ठ नेते आणि क्रीडामंत्री अरूप विश्वास म्हणाले की, फिफा विश्वचषकातील माझी आवडती टीम ब्राझिल आहे. त्यामुळे मी ब्राझिलचा एकही सामना चुकवू शकत नाही. त्याचबरोबर, बाकीच्या टीमचे सामने पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.
अरुप विश्वास यांचे सहकारी आणि राज्य मंत्रिमंडळीतील नेते पार्थ चॅटर्जी यांनी सुद्धा फुटबॉलचे सामने पाहण्याचे ठरविले आहे. त्यांची सुद्धा ब्राझिल आवडती टीम आहे. यावेळी पार्थ चॅटर्जी म्हणाले की, मी ब्राझिल, अर्जेंटिना आणि जर्मनी टीमचे सामने पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, रात्री उशिरा सामने असतील, तर ते टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपाचे नेते दिलीप घोष, राहुल सिन्हा यांच्यासह इतर पक्षातील नेतेमंडळी सुद्धा फिफा विश्वचषकातील सामन्यांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, फिफाच्या झळाळत्या विश्वचषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.