कजान : फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटातील पहिल्या लढतीत बलाढ्य फ्रान्सने आॅस्ट्रेलियाला २-१ गोलने पराभूत केले. फ्रान्सच्या अॅँटोनी ग्रीझमानने वॉर प्रणालीचा वापर करून मिळालेल्या पेनल्टीवर गोल केला. फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा सामना फ्रान्ससाठी महत्त्वाचा होता. क गटातील हा पहिलाच सामना जिंकण्याचे फ्रान्सचे मनसुबे होते. युरो चषक स्पर्धेत सहा गोल करणाऱ्या ग्रीझमानच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते.फ्रान्सने आक्रमक खेळास सुरुवात केली. परंतु, आॅस्ट्रेलियाच्या बचावाची फळी भेदण्यात त्यांना पूर्वार्धात यश आले नाही. बेहीच, मिलिगन, सन्सबरी आणि रिसडन या बचावाच्या फळीने पूर्वार्धात आपली भूमिका चोख पार पाडली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना ०-० अशा बरोबरीत राहिला.उत्तरार्धात मात्र फ्रान्सने दुप्पट जोशाने आक्रमणाला सुरुवात केली आणि पेनल्टी किकच्या रूपाने फ्रान्सला गोल करण्याची संधी मिळाली. ५८ व्या मिनिटाला जोश रिश्डनने ग्रीझमानला पाडले. पंचांनी सुरुवातीला पेनल्टी नाकारली, मात्र वीएआर फुटेज पाहिल्यानंतर पेनल्टी देण्यात आली. ग्रीझमानने आॅस्ट्रेलियाचा गोलरक्षक मॅथ्यू रेयान याला चकवत गोल केला. विश्वचषक स्पर्धेत वॉर प्रणालीमुळे गोल करणारा ग्रीझमान हा पहिला खेळाडू ठरला. या गोलमुळे फ्रान्सला १-० ची आघाडी मिळाली. मात्र फ्रान्सचा हा आनंद अल्प काळच टिकला. सामन्याच्या ६२ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेडीनाक याने पेनल्टीवर गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. ग्रीझमानच्या ऐवजी मैदानात उतरलेल्या आॅलिव्हर गिरोडने चांगल्या चाली रचल्या. संघ पिछाडीवर असल्याचे पाहून आॅस्ट्रेलियानेही आक्रमणाला सुरुवात केली. सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला आॅलिव्हर गिरोडने दिलेल्या पासवर पॉल पोग्बाने गोल करत फ्रान्सची आघाडी २-१ अशी भक्कम केली. सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम राहिली.
Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 5:48 PM