मुंबई : दर चार वर्षांनी येणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजले की, क्रिकेटवेड्या भारतामध्ये नेहमी राष्ट्रीय फुटबॉल संघावर टीका होते. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते. पण असे असले तरी १९५० साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पात्रता मिळवली होती, परंतु त्या वेळी काही कारणास्तव भारतीय संघाने स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.या आव्हानात्मक स्पर्धेस पात्र ठरूनही एखाद्या संघाने माघार घेतली तर? अशा वेळी त्या संघाची विश्वविजेत्या संघाहून अधिक चर्चा होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे हा भारतीय संघ होता. १९५० ते १९६०च्या दरम्यान भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ होता. १९५० सालच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाने पात्रताही मिळवूनही माघार घेतली. ही घटना अनेक भारतीयांना लक्षात असून त्यासाठी कारण दिले जाते की, भारतीयांकडे शूज नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझीलला जाण्यास इच्छुक नव्हता.भारताचे तत्कालीन कर्णधार सेलिन मन्ना यांच्या मते, ‘शूज नसल्याची गोष्ट या सर्व वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे.’ स्पर्धेत सहभागी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्या वेळी भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझील प्रवासाचा खर्च उचलण्यास तयार नव्हते. शिवाय संघाची तयारीही पूर्ण झालेली नव्हती. त्या वेळी विश्वचषकऐवजी आॅलिम्पिकला अधिक महत्त्व असल्याने या स्पर्धेची कमतरता आॅलिम्पिकमध्ये भरून काढण्यास भारतीय जास्त इच्छुक होते.- १९५६ सालच्या आॅलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्येही भारताने आपली छाप पाडली होती. उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर भारताची घोडदौड रोखली गेली. यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत बल्गेरियाविरुद्ध पराभव झाल्याने थोडक्यात भारताचे पदक हुकले. उपांत्यपूर्व फेरीत आॅस्टेÑलियाविरुद्ध नेविले डिसूझा याने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवलेला. विशेष म्हणजे हॅट्ट्रिक करणारा नेविले पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.
FIFA World Cup 2018 : भारतानेही मिळवलेली पात्रता, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:53 AM