मॉस्को : फुटबॉल विश्वचषक ज्या शहरात होत असतो तिथे सर्वाधिक सेक्स केला जातो, असा आतापर्यंतचा इतिहास सांगतो. पण यजमान देशातील महिलांना या साऱ्या गोष्टींची चांगलीच किंमत चुकवावी लागते, असे पाहण्यात आले आहे. त्यामुळे रशियातील एका खासदारांनी महिलांना परदेशी पुरुषांबरोबर सेक्स न करण्याचे आवाहन एका रेडिओच्या कार्यक्रमामधून केले आहे.
रशियातील मॉस्को शहरामध्ये 1980 साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही परदेशी पुरुषांनी रशियातील स्त्रियांबरोबर सेक्स केला होता. त्यानंतर या महिलांना या परदेशी पुरुषांपासून मुलं झाली. पण या परदेशी पुरुषांनी मात्र या मुलांची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे रशियातील महिलांना त्यांचे एकल पालकत्व पत्करावे लागले होते. या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्लेत्नयोवा या खासदारांनी रशियातील महिलांना आवाहन केले आहे.
रशियामध्ये ' चिल्ड्रन ऑफ दी ऑलिम्पिक्स ' या कार्यक्रमामध्ये खासदार प्लेत्नयोवा यांना काही प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांची उत्तरे देताना प्लेत्नयोवा यांनी सांगितले की, " बऱ्याच वेळा परदेशी पुरुष आपल्यापासून झालेल्या मुलांचे पालकत्व सांभाळत नाहीत. या गोष्टीचे वाईट परिणाम एकल पालकत्व पत्करलेल्या महिलांवर होतात. आम्हाला हीच गोष्ट टाळायची आहे. त्यामुळे मी असे आवाहन करत आहे. "