मॉस्को : कर्णधार ईडन हेजार्ड आणि रोमेलु लुकाकू यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बेल्जियमनं ट्यूनेशियाचा पराभव केला आहे. ट्यूनेशियाचा 5-2 असा धुव्वा उडवत बेल्जियमनं पुढील फेरीत प्रवेश केला आहे. ट्यूनेशियाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जी गटातील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी बेल्जियमला या सामन्यात विजय आवश्यक होता. तर ट्यूनेशियाला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी विजय गरजेचा होता. सामन्याला सुरुवात होताच बेल्जियमचा कर्णधार ईडन हेजार्डनं सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. यानंतर लुकाकूनं 16 व्या मिनिटाला गोल डागत संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ट्यूनेशियाच्या डेलन ब्रोननं 18 व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमची आघाडी 2-1 नं कमी केली. मात्र यानंतर ट्यूनेशियाच्या पदरी निराशाच आली. पहिलं सत्र संपण्याआधी लुकाकूनं पुन्हा एकदा ट्यूनेशियाचा बचाव भेदला. त्यामुळे बेल्जियमला 3-1 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताच बेल्जियमनं आक्रमक खेळ सुरु केला. ईडन हेजार्डनं 51 व्या मिनिटाला सामन्यातील स्वत:चा दुसरा, तर संघाचा चौथा गोल नोंदवला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. अखेर 90 व्या मिनिटाला बेल्जियमच्या मिती बात्शुयाईला गोल करण्यात यश आलं. त्यामुळे बेल्जियमनं 5-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर तीनच मिनिटांनी ट्यूनेशियाचा कर्णधार वाहबी खाजरीनं गोल नोंदवला. ईडन हेजार्ड आणि रोमेलु लुकाकू यांच्या दमदार खेळामुळे बेल्जियमनं पुढील फेरीत धडक मारली आहे. तर सलग दुसऱ्या पराभवामुळे ट्यूनेशियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
FIFA World Cup 2018: बेल्जियम बाद फेरीत; दुसऱ्या पराभवामुळे ट्यूनेशियाचं पॅकअॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 10:14 PM