सोची : रोमेलू लुकाकूने केलेल्या दोन गोलच्या जोरावर फुटबॉल विशवचषकात बेल्जियमला पनामावर 3-0 असा सफाईदार विजय मिळवता आला. बेल्जियमने हे तिन्ही गोल दुसऱ्या सत्रातच केले.
सामन्याच्या सुरुवातीची पहिली दहा मिनिटे बेल्जियमने चेंडूचा ताबा जवळपास आपल्याकडेच ठेवला होता. दहा मिनटांमध्ये 80 टक्के चेंडू हा बेल्जियमकडे होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी चेंडूवरची पकड गमावली. दहा मिनिटांनंतर पनाचा संघही थोडा आक्रमक झालेला दिसला. पनामाने त्यानंतर बेल्जियमला पहिला सत्रात कडवी झुंज दिली आणि त्यांना गोल करण्यापासून परावृत्त केले. पनामासारख्या संघाविरुद्ध खेळत असताना गोल करता येत नाही, हे पाहून बेल्जियम खेळाडू हताश झालेले दिसले.
पहिल्या सत्रात बेल्जियमच्या संघाने अपेक्षाभंग केला, पण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ केला. मध्यंतरानंतर दुसऱ्याच मिनिटाला मेरटेन्सने गोल करत बेल्जियमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र मैदानात घोंघवले ते लुकाकू नावाचे वादळ. सामन्याच्या 69व्या मिनिटाला सुरेख हेडर मारत लुकाकूने संघासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांनीच लुकाकूने पनामाची बचावफळी भेदली आणि त्यानंतर गोलरक्षकाला चकवत त्याने संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला.