फुटबॉलचा महामेळा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2018 सुरु व्हायला आता काही दिवसच उरले आहेत. 14 जून ते 15 जुलैपर्यंत रशियामध्ये 32 टीम्स खेळणार असलेल्या सामन्यांकडे फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलं आहे. भारतासह पाकिस्तानही या फुटबॉल स्पर्धेचा भाग नसणार आहे. पण पाकिस्तान या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा भाग असणार आहे.
फिफा वर्ल्ड कप 2018 मध्ये 'टेलस्टार 18' या बॉलने सामने खेळले जाणार आहे. महत्वाची गोष्टी म्हणजे हे बॉल पाकिस्तानातील एका कंपनीने तयार केले आहेत. टेलस्टार 18 हा बॉल आदिदास या कंपनीने डिझाईन केला असून फुटबॉल वर्ल्ड कपसाठी बॉल डिझाईन करण्याची आदिदासची ही 13 वी वेळ आहे. फुटबॉलच्या पहिल्या वर्ल्ड कपमधील बॉललाही टेलस्टार 18 हे नाव देण्यात आले होते. तेच नाव आदिदासने पुन्हा एकदा वापरले आहे.
टेलस्टार 18 हा बॉल हा तयार करण्याचं काम पाकिस्तानच्या सियालकोटमधील फॉरवर्ड स्पोर्ट कंपनीला देण्यात आलं आहे. ही कंपनी आपल्या खेळ वस्तूंच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीत प्रत्येक महिन्यात 7 लाख बॉल तयार केले जातात. हे बॉल जगभरात पाठवले जातात. ही कंपनी आदिदाससोबत 1094 पासून काम करत आहे. 2014 आणि 2018 या वर्ल्ड कपसाठी याच कंपनीने फुटबॉल तयार केले आहे.
पाकिस्तानची कंपनी फॉरवर्ड स्पोर्ट कंपनीने जाएंट लीग ऑफ फुटबॉलसोबत कॉन्ट्रॅक्ट केला असून ही कंपनी वेगवेगळ्या देशांच्या टीम्सनाही फुटबॉल पुरवणार आहे. अशाप्रकारे पाकिस्तान फुटबॉल टीम फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी नसूनही पाकिस्तानचा सहभाग प्रत्येक सामन्यात असणार आहे.