मॉस्को : माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉसन हे ठरले. अर्जेंटिनासाठी स्टार लियोनेल मेस्सीने ६४ व्या मिनिटाला गमावलेली पेनल्टी ही विजयापासून वंचित ठेवणारी ठरली.सामन्याचे दोन्ही गोल पहिल्या सत्रात झाले. मध्यतरानंतर एकही गोल झाला नाही. अर्जेंटीनासाठी गोल सर्जिओ अगुरो याने १९ व्या मिनिटाला गोल केला तर आईसलँडसाठी आल्फ्रेड फिनबॉसन याने २३ व्या मिनिटाला बरोबरी साधली. अर्जेंटिनाचा संघ गेल्या तीन विश्वचषक स्पर्धात आपल्या गटात पहिल्या स्थानी राहिला आहे परंतु आज विजय हुकल्यावर त्यांची ही मालिका यंदा खंडीत होण्याची भिती आहे. याशिवाय अर्जेंटिनाने गेल्या सहा विश्वचषकात आपला सलामी सामना जिंकून विजयी सुरूवात केली होती, ती परंपरासुद्धा आज खंडीत झाली. अगुरो आणि फिन्नबॉगसन यांच्या गोलांमुळे सामना मध्यंतरावेळी १-१ बरोबरीत होता. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणा-या आईसलँडने निश्चितपणे या सत्रात दमदार खेळ करून मने जिंकली. ते कोणत्याही दडपणात दिसले नाही आणि सुनियोजीतरित्या खेळतांना दिसले. चेंडूवर ताबा मिळाल्यावर त्याचा उपयोग करून घेताना ते दिसले. त्यांच्या पासेसही चांगल्या झाल्या. सामन्याच्या १९ व्या मिनिटालाच सर्जियो अगुरोने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्याने डाव्या फळीकडून मार्कोस रोजोच्या पासवर डाव्या पायाने चेंडू गोलपोस्टच्या छताला भिरकावला. मात्र या गोलच्या कुठल्याही दडपणात न येता आईसलँडने खेळ करत २३ व्या मिनिटाला बरोबरी साधली.त्यांच्या अल्फ्रेड फिनबॉगसन याने चतुराईने हा गोल केला. गोलपोस्टच्या पुढ्यात सिगुर्डसनने दिलेल्या हळूवार पासवर त्याने फक्त चेंडूला गोलपोस्टकडे दिशा देण्याचे काम केले आणि सामना बरोबरीवर आणला.
FIFA World Cup 2018 : मेस्सीची 'किक' चुकली, अर्जेंटिनाला बरोबरीची 'पेनल्टी'; आईसलँडचा 'कूssल' खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 8:41 PM