सचिन कोरडे
फुटबॉल विश्वचषकातील आइसलॅँड-अर्जेंटिना यांच्यातील सामन्यात सर्वाधिक लक्ष होते ते केवळ लियोनेल मेस्सी याच्यावर. फुटबॉल जगतातील हा दिग्गज या सामन्यात काय करामत करणार? याची उत्सुकता लागली होती. मात्र, मेस्सीने त्यावर पाणी फेरले. सामना जिंकून देण्याची नामी संधी मेस्सीला मिळाली होती. पेनल्टीवर मारलेला मेस्सीचा फटका आइसलॅँडचा गोलरक्षक हॅनेस हॉलडर्सन याने अडवला आणि तोच या सामन्यातील हिरो ठरला.
गोल न झाल्याने मेस्सीसुद्धा खूप निराश झाला होता. त्यामुळे मेस्सीचा गोल अडवणारा हॅनेस हा आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर नेटिझन्सने शोधमोहीम सुरू केली. त्यात त्याच्या जीवनाची अनोखी कारकिर्द हाती लागली. हॅनेस हा व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शकही आहे. ३४ वर्षीय या खेळाडूने प्रोफेशनल फिल्ड डायरेक्टर म्हणून सुरुवात केली होती. त्याने विविध म्युझिक व्हिडिओ, लघुपट आणि ‘लिनिलोग्गा’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. आता हा डायरेक्टर फुटबॉलच्या मैदानातही प्रसिद्धीच्या झोतात आहे.
विश्वचषकातील ‘क’ गटातील आइसलॅँड-अर्जेंटिना हा सामना बरोबरीवर आटोपला. मात्र, आइसलॅँड गटात आपण सामना जिंकल्याप्रमाणेच वातावरण होते. त्याचे सर्व श्रेय त्यांनी हॅनेस यालाच दिले आहे. त्याचा तो अप्रतिम बचाव अभिनंदनास पात्र ठरत आहे. विश्वचषकापूर्वी हॅनेस याने मेस्सीच्या खेळाचा अभ्यास केला होता. तो रोज मेस्सीचे व्हिडिओ पाहायचा. अखेर त्याची ही मेहनत फळाला आली. सामन्यानंतर त्याने याबाबत प्रतिक्रिया सुद्धा दिली. यात त्याने म्हटले की, मी मेस्सीचा अभ्यास केला होता. होमवर्क केले होते, त्यामुळे मेस्सीची पेनल्टी अडवू शकलो. अशी स्थिती येईल, याची जाणीव होती.