मॉस्को : ज्याचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉल विश्व आतूर झाले होते, तो इजिप्तचा मोहम्मद सलाह आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. इजिप्तचा सामना आता रशियाबरोबर होणार असल्यामुळे यजमानांना सलाह तंदुरुस्त झाल्यामुळे धडकी भरली आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे सलाहला इजिप्तच्या पहिल्या विश्वचषकाच्या सामन्यात खेळता आले नव्हते. या गोष्टीचा फटका इजिप्तला उरुग्वेबरोबरच्या पहिल्या सामन्यात बसला होता. पहिल्या सामन्यात इजिप्तने चांगला बचाव केला होता. पण अखेर त्यांना उरुग्वेकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता सलाह संघात खेळणार असल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले असेल.
पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे इजिप्तला रशियाबरोबर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यांना विजय मिळवता आला नाही तर त्यांना हा सामना बरोबरीत तरी सोडवता यायला हवा. जर इजिप्तला या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे सलाह रशियाविरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.