मॉस्को : स्वत:हून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रत्यय दाखवून दिला तो मोरॅक्कोच्या संघाने. रशियात सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मोरॅक्कोच्या बोऊहादोऊझने स्वयंगोल केला आणि त्यामुळे इराणला आयता विजय मिळवता आला. इराणचा विश्वचषकातील हा दुसरा विजय आहे, याआधी 1998 मध्ये अमेरिकेवर 2-1 असा विजय मिळविला होता.
हा सामना चांगलाच रंगला. पहिल्या सत्रात मोरॅक्कोने चांगलेच आक्रमक केले होते. पण त्यांना गोल करण्यात मात्र यश आले नाही. संपूर्ण सामन्यात 68 टक्के चेंडूचा ताबा मोरॅक्कोकडे होता. गोल करण्याच्या संधीही त्यांच्याकडे होत्या, पण या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही.
सामन्याच्या निर्धारीत 90 मिनिटांमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर सहा मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला होता. या भरपाई वेळेच्या पाचव्या मिनिटाला बोऊहादोऊझने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू ढकलला आणि मोरॅक्कोला सामना गमवावा लागला.