चिन्मय काळे : रशिया विश्वचषकातील कदाचित सर्वाधिक लक्षणीय लढत पोर्तुगाल आणि स्पेन या दोन शेजारी देशांच्या संघामध्ये होत आहे. दोघांकडेही स्टारपेक्षाही ‘स्टारडम’ खेळाडूंचा भरणा आणि दोघही विश्वचषकाचे प्रबळ दावेदार यामुळे संपूर्ण फुटबॉल जगताचे या सामन्याकडे लक्ष असेल. एका अत्यंत चुरशीच्या लढतीची अपेक्षा या सामन्याबाबत प्रेक्षकांना आहे.एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे.
पोर्तुगाल आणि स्पेन या दोन्ही संघांच्या ताकदीचा विचार केल्यास खरोखर ही लढत तुल्यबळ अशीच आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि ग्लॅमर जगतात नाव असलेला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीआनो रोनाल्डोभोवती हा सामना असेल, यात शंका नाही. रोनाल्डोनेच या सामन्यात पहिला गोल करावा, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याच्या जोडीला अनुभवी ब्रोनो आल्व्स, पेपे, जुआओ मॉन्टीन्हो, आंद्रे सिल्व्हा, विल्यम कार्व्हालो या दमदार खेळाडूंची फौज असेल. रोनाल्डो हीच पोर्तुगालची खरी ताकद असेल. त्याखेरीज दोनच वर्षांपूर्वी झालेला युरो कप पोर्तुगालने अनपेक्षितपण जिंकला. त्यामुळे संघाचे मनोबल वाढलेले आहे. फर्नाडो सॅन्तोस हे अनुभवी प्रशिक्षकही संघाच्या दिमतीला आहेत.
याखेरीज काहीशी नकारात्मक स्थिती स्पेनच्या तंबूत आहे. विश्वचषकाच्या तोंडावर १३ जूनला त्यांच्या असोसिएशनने प्रशिक्षकांना घरी पाठवले. त्याजागी तडका-फडकी फर्नांडो हिरेरो यांची नियुक्ती करण्यात आली. याचा स्पेनच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण कर्णधार सर्जिओ रेमोस, जेरार्ड पिक्यू, आंद्रेस इनिएस्टा, दिएगो कोस्टा, डेव्हिड सिल्व्हा या २०१० च्या विश्वचषक विजेत्या संघातील अनुभवी खेळाडू संघात आहेत. पण पोर्तुगालच्या रोनाल्डोचा झंझावात स्पेनच्या खेळाडूंना नाकात दम आणू शकतो. रोनाल्डोला रोखता आले तरी स्पेनला अर्धा विजय सोपा होईल, हे नक्की.खास रोनाल्डोला रोखण्याच्यादृष्टीने स्पेन या सामन्यात ४-१-२-२-१ अशा आगळ्या पद्धतीने खेळण्याची शक्यता आहे. पण स्पेनच्या थिअॅगो, कोस्टा यांना रोखण्यासाठी पोर्तुगालसुद्धा याच पद्धतीची व्युहरचना करण्याच्या प्रयत्नात आहे. बेटींग तज्ज्ञांनी स्पेनलाच झुकते माप दिले आहे. पण एकंदर सामना चुरशीचाच होण्याची दाट शक्यता आहे.