निजनी : रफाएल व्हॅरने आणि अँटोनी ग्रीझमन यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल लगावत फ्रान्सने उरुग्वेवर उपांत्यपूर्व फेरीत 2-0 असा सहज विजय मिळवला.
व्हॅरने गोलच्या जोरावर फ्रान्सने उरुग्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकचा पुरेपूर फायदा घेत व्हॅरनेने संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी निभावली.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ग्रिझमनने जोरदार किक लगावत फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 61व्या मिनिटाला ग्रिझमनने मारलेली किक उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुसलेराला अडवण्यासारखी होती. पण मुसलेराला यावेळी चांगला बचाव करता आला नाही. मुसलेराच्या हाताला लागूनच चेंडू उरुग्वेच्या गोलजाळ्यात गेला आणि फ्रान्सने 2-0 अशी आघाडी मिळवत विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.