मुंबई : रशियामधल्या फुटबॉल विश्वचषकाला आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. हा विश्वचषक कोण जिंकणार, यावर पैजा लागायला सुरुवात झाली आहे. ब्राझील, अर्जेंटीना, उरुग्वे यांच्यासह एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे जर्मनी. कारण जर्मनीने गेल्यावेळी विश्वचषकाला गवसणी घातली होती. पण यावेळी त्यांना खुणावतोय ' हा ' विक्रम.
जोआकिम लो यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीचा संघ गेल्या 12 वर्षांपासून नेत्रदीपक कामगिरी करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीने गेल्यावेळी विश्वचषकाला गवसणी घातली होती. गेल्या वर्षी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये जर्मनीचा संघ अव्वल ठरला होता. त्याचबरोबर विश्वचषक पात्रता फेरीतील सर्वच सामने त्यांनी जिंकले होते. पण तरीही त्यांना ' हा ' विक्रम करता येईल का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
प्रत्येक देश विश्वचषकाची वाट पाहत असतो. हा विश्वचषक आपण देशाला पटकावून द्यावा, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. ब्राझीलने आतापर्यंत सलग दोनदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 1962 साली त्यांनी दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. सध्याच्या घडीला हा विक्रम करण्याची संधी जर्मनीकडे आहे. त्यामुळे जोआकिम लो यांच्या मार्गदर्शनाखाली जर्ममीचा संघ हा विक्रम करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.