मॉस्को : सेनेगलसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने मंगळवारी सर्वांनाच जोरदार धक्का दिला. पोलंडच्या खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा यावेळी सेनेगलला चांगलाच फायदा झाला. जोरदार आक्रमण करत सेनेगलने पोलंडला यावेळी 2-1 अशा फरकाने पराभूत केले.
सामन्याच्या 37व्या मिनिटाला थिआगो सिओनेकने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू धाडला आणि सेनेगलचा पहिला गोल झाला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात यश मिळाले नाही आणि सेनेगलने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली.
सामन्याचे दुसरे सत्र चांगलेच रंजक झाले. सेनेगलच्या निनांगने पोलंडचे बचावपटू आणि गोलरक्षक यांना चकवत 60व्या मिनिटाला गेल केला आणि संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलनंतर पोलंडच्या संघाने जोरदार आक्रमणे केली, पण त्यांना यश मिळाले ते 86व्या मिनिटाला. पोलंडच्या क्रिचोविअॅकने संघासाठी पहिला गोल केला. या गोलनंतर पोलंडचा संघ अधिक आक्रमक झाला, पण त्यांना दुसरा गोल करून सामन्यात बरोबरी साधता आली नाही.