मॉस्को : आपल्या देशासाठी शंभरावा सामना खेळणे, म्हणजे एखाद्या खेळाडूसाठी फार मोठी गोष्ट असते. हा शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. हा योग पाहायला मिळाला तो उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझच्या बाबतीत.
बुधवारी फुटबॉल विश्वचषकात उरुग्वे आणि सौदी अरेबिया यांच्यात सामना रंगला. हा सुआरेझचा शतकी सामना होता. सुआरेझने सामन्याच्या 23 मिनिटाला गोल लगावला आणि स्टेडियममध्ये साऱ्यांच्याच आनंदाला उधाण आले. सुआरेझनेही आपल्या खास पद्धतीने हा आनंद साजरा केला.
सुआरेझचा उरुग्वेसाठीचा हा 52वा गोल आहे. त्याचबरोबर तीन विश्वचषकांमध्ये गोल करणारा सुआरेझ हा उरुग्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे.