मॉस्कोः ब्राझीलचा स्टार नेमारचा 'दे मार' खेळ बघण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असताना, फिलीप कोटिन्होनं झंझावाती गोल झळकावून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. हा गोल झाला, तेव्हा नेमारची अवस्था काय होती, हे पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची सहज कल्पना येऊ शकते.
ब्राझीलच्या एकमेव गोलमध्ये नेमारची भूमिकाही महत्त्वाची होती. त्याचा पास मोलाचा ठरला. परंतु, त्यानंतर त्याला काहीच करता आलं नाही. कारण, तो चक्रव्यूहातच अडकला होता. चेंडू गोलपोस्टजवळ असताना नेमार धोकादायक ठरू शकतो, हे हेरून स्वित्झर्लंडच्या दोन-तीन नव्हे तर पाच खेळाडूंनी त्याला घेरलं होतं. हे एका अर्थाने ब्राझीलच्या पथ्यावरच पडलं. कारण, नेमार अडकल्याचं पाहून कोटिन्होनं किक लगावली आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम आणि सर्वात उपयुक्त गोल साकारला.
सर्वाधिक फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेल्या आणि यंदाही जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये असलेल्या ब्राझीलला सलामीच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यांचे चाहते थोडे हिरमुसलेत. 'दे दणादण' आक्रमणं करूनही स्वित्झर्लंडनं त्यांना बरोबरीत रोखलं. नेमारकडून ब्राझीलच्याच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींना खूप आशा होत्या. ख्रिस्टियानो रोनाल्डोसारखी जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित होती. पण, नेमार निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालं. स्वित्झर्लंडने त्याला असं 'ट्रॅप' केलं होतं की ठरावीक मर्यादेपलीकडे तो काहीच करू शकला नाही. अर्थात, त्यातून मार्ग काढण्याचं कसब त्याला जमलं नाही आणि फ्री किकच्या चालून आलेल्या संधी त्यानं कर्माने गमावल्या, हेही तितकंच खरं.