मॉस्को : इजिप्तविरुद्धचा फुटबॉल विश्वचषकातील सामना उरुग्वे सहज जिंकेल, असे वाटत होते. पण इजिप्तने चांगला बचाव करत उरुग्वेच्या आक्रमणपटूंना रोखत चाहत्यांची मने जिंकली. पण सामन्याच्या 90व्या मिनिटाला जोस गिमिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने हा सामना 1-0 अशा फरकाने जिंकला.
उरुग्वेने सुरुवातीपासून चांगले आक्रमण लगावले. पण इजिप्तच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. पण अखेरच्या क्षणी, सामना संपायला फक्त एक काही सेकंद शिल्लक असताना गिमिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने विजय साजरा केला. उरुग्वेच्या सुआरेझ आणि कॅवानी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
गेल्या सहा विश्वचषकात उरुग्वेला सलामीची लढत कधीही जिंकता आली नव्हती. उरुग्वेने 1970 साली झालेल्या विश्वचषकात सलामीची लढत जिंकली होती. पण त्यानंतर त्यांना सलामीच्या लढतीत विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे या विजयामुळे उरुग्वेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.