सचिन खुटवळकर
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ अशा काहीशा मनोवस्थेतून गेलेल्या झिनेदिन झिदान या रियल माद्रिदच्या मुख्य प्रशिक्षकाने गेल्याच आठवड्यात राजीनामा दिला आणि फुटबॉल जगतात आश्चर्याचा कल्लोळ उसळला.
रियल माद्रिदला युरोपियन चॅम्पियन्स आणि चॅम्पियन्स लीगचे विजेते बनविल्यानंतरही झिदान यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने माद्रिद समर्थकांत खळबळ उडाली होती. यामागील खरे कारण ना रियल माद्रिदच्या व्यवस्थापनाने उघड केले ना झिदान यांनी. विशेष म्हणजे झिदान यांच्या कराराचा कालावधी २0२0 पर्यंत असूनही त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला. त्यामुळे या विषयाचे गूढ कायम आहे. तरीही, स्पॅनिश वृत्तमाध्यमांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, झिदान यांनी अलीकडेच रियल माद्रिदला सलग तिसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशीप मिळवून दिली खरी; परंतु यात ते अयशस्वी ठरले असते, तर करार संपुष्टात येण्यापूर्वी व्यवस्थापनाने त्यांची उचलबांगडी केली असती. याची कुणकुण झिदान यांनाही लागली होती. या राजीनामा नाट्यामागचे हे प्रमुख कारण होते.
झिदान यांचे योगदान
- झिदान यांनी २०१६ मध्ये रॅफेल बेनिट्झ यांच्याकडून माद्रिदची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तीनवेळा या क्लबला युरोपियन विजेते बनवले. स्पॅनिश साखळीतही विजेते केले. बार्सिलोनाला मागे टाकून त्यांनी २०१२ नंतर पहिलेच विजेतेपद मिळविले.
- आपल्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत झिदान यांनी नऊ प्रमुख स्पर्धांची विजेतेपदे मिळविली. दरम्यान, नजीकच्या काळात आपण कोणत्या क्लबशी करार करणार, हे झिदान यांनी स्पष्ट केलेले नसले, तरी मँचेस्टर युनायटेडशी त्यांची बोलणी चालू असल्याचे वृत्त आहे.
- शिवाय ख्रिस्तियानो रोनाल्डो व वेल्सचा खेळाडू गॅरेथ बेल हे रियल माद्रिद सोडणार असल्याच्या वावड्या उठल्या असून ते झिदान यांच्यामार्फत मँचेस्टर युनायटेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- झिदान हे फ्रान्स या त्यांच्या मायदेशाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतील, असेही वृत्त आहे. झिदान यांनी मात्र त्याबाबत मौन साधले आहे.
- या पार्श्वभूमीवर फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर हे अंदाज खरे ठरतील का, याची फुटबॉल जगतात उत्सुकता आहे.