पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. क्रोएशियाने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता. दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि सुरुवातीलाच एकापाठोपाठ एक असे चार गोल पहिल्या ३६ मिनिटांमध्ये केले.
ब्राझीलकडून पहिला गोल विनिशियस ज्युनियर याने केला. विनिशियस ज्युनियरने सामन्यातील सातव्या मिनिटाला जबरदस्त गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १३व्या मिनिटाला नेयमारने गोल करून ब्राझीलची आघाडी २-० अशी वाढवली. मग २९व्या मिनिटाला रिचर्लिसनने गोल करून ही आघाडी ३-० अशी भक्कम केली. तर त्यानंतर काही मिनिटांनी ३६ व्या मिनिटाला लुकस पकेटाने गोल करून ब्राझीलला ४-० असे आघाडीवर नेले आणि संघाचा विजय निश्चित केला.
सामन्यात मध्यांतरापूर्वीच ब्राझीलचा संघा ४-० अशा आघाडीवर पोहोचला. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात दक्षिण कोरियाने पुनरागमन करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ब्राझिलचा गोलरक्षक एलिसन याने ते निष्फळ ठरवले. पण ७६ व्या मिनिटाला पाईक सियुंगने गोल करून दक्षिण कोरियाचे खाते उघडले. त्यानंतर मात्र कोरियन संघाला आणखी गोल करता आला नाही. दरम्यान, आजचा विजय ब्राझीलच्या संघाने सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले महान फुटबॉलपटू पेले यांना समर्पित केला.