Fifa World Cup 2022: अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकातील अतिशय उत्कंठावर्धक सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य अशा ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ (१-१) अशा फरकाने पराभव करत मोठा धक्का दिला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा ब्राझील प्रमुख दावेदार मानला जात होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर क्रोएशिया फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.
बलाढ्य अशा ब्राझीलचा पराभव केल्यानंतर आता उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाची लढत अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील विजेत्याशी होईल. तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीतील सामना ब्राझीलसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. सामन्याच्या निर्धारित वेळेत कोणताही संघ गोल करू शकला नाही. त्यामुळे अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत ब्राझीलच्या नेयमारने १०५ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलसह नेयमारने विश्वविक्रमही रचला. नेयमारचा हा ७७ वा गोल होता. यासह त्याने फुटबॉलमधील महान खेळाडू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली.
क्रोएशियाने गोल करून सामना बरोबरीत आणला आणि जिंकलाही
आता सामना ब्राझीलच्या खिशात जाणार असे वाटत असतानाच क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर ब्रुनो पेटकोविच याने ११७ व्या मिनिटाला गोल केला. यामुळे अतिरिक्त वेळ संपेपर्यंत हा सामना १-१ अशा बरोबरीत राहिला. अखेर पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला आणि इथे क्रोएशियाने बाजी पलटवली. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला प्रथम संधी मिळाली. एन. व्लासिक याने या संधीचे सोने करत प्रथम गोल डागला. मात्र, ब्राझीलच्या रोड्रागोचा गोल अत्यंत हुशारीने क्रोएशियाच्या गोलकिपरने रोखला. यानंतर क्रोएशियाचा प्रत्येक गोल अगदी निशाण्यावर लागला. यामध्ये ब्राझीलला फक्त दोन गोल करता आले. यामुळे क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये हा सामना ४-२ च्या फरकाने खिशात घातला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"