अल रेयॉन : मिकी बात्सुयाईने पूर्वार्धातील खेळात अखेरच्या क्षणी नोंदविलेल्या गोलमुळे बेल्जियमने सर्वोत्कृट कामगिरी न करताही कॅनडाचा फिफा विश्वचषकात बुधवारी मध्यरात्री १-० ने पराभव केला. कॅनडा संघाचे ३६ वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन झाले, हे विशेष.
फिफा क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला लौकिकानुसार कामगिरी मात्र करता आली नाही. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक केविन डी ब्रूएन हादेखील संघाच्या कामगिरीवर निराश झाला. त्याची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली, तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. कॅनडाने विश्वचषकात आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यांना एकही गोल नोंदविता आलेला नाही. १९८६ च्या विश्वचषकात हा संघ तीन सामने खेळला होता. कॅनडाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत सामन्यात २१ शॉट मारले. उलट, बेल्जियमला केवळ नऊ शॉट मारता आले.