दोहा - फिफा वर्ल्डकप २०२२ च्या अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झाले आहेत. अर्जेंटिना आणि गतविजेता फ्रान्स हे संघ रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. या सामन्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. मात्र त्याचदरम्यान, अर्जेंटिनाच्या संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी जखमी झाला आहे. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मेस्सी हॅमस्ट्रिंगबाबत त्रस्त दिसत होता. दरम्यान, गुरुवारी मेस्सी सरावासाठीही न उतरल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, आता मेस्सी फायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत फॅन्स चिंतीत दिसत आहेत.
अर्जेंटिनाने मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात चिवट क्रोएशियाचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. याच सामन्यादरम्यान ३५ वर्षीय मेस्सीला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत असल्याचे दिसत होते. सामन्यादरम्यान कथितपणे त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्याने गुरुवारी संघासोबत सराव केला नव्हता. त्याच्याशिवाय इतरही काही प्रमुख खेळाडूंनाही आराम देण्यात आला आहे. एका फुटबॉलसंबंधित वेबसाईटनुसार मेस्सीला त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास जाणवत आहे.
मात्र असे असले तरी लियोनेल मेस्सी हा रविवारी फ्रान्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. अंतिम सामन्यातून तो बाहेर होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र त्याच्या फिटनेसबाबत फॅन्स चिंतीत आहे. जर मेस्सी फायनलमध्ये खेळला नाही तर फायनलचा थरार कमी होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवार १८ डिसेंबर रोजी फ्रान्स आणि अर्जेंटिनाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. अर्जेंटिनाचा संघ उपांत्य फेरीत क्रोएशियाला ३-० असे पराभूत करून फायनलमध्ये पोहोचला आहे. तर फ्रान्सने मोरक्कोवर २-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे.