दोहा : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात जपानने बुधवारी रात्री चार वेळेच्या विजेत्या जर्मनीला धूळ चारून आशियाचा डंका वाजविला. या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करताना जपानच्या चाहत्यांनी फिफाच्या व्यासपीठावर अख्ख्या जगाला स्वच्छतेचाही धडा शिकविला. सामन्यांनतर एकीकडे जपानच्या खेळाडूंनी स्वत:चे लॉकर रूम (ड्रेसिंग रूम) स्वच्छ केले, तर चाहत्यांनी निरोप घेण्याआधी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमची साफसफाई केली.
फिफाने याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. या फोटोत जपानच्या खेळाडूंचे लॉकर रूम स्वच्छ आणि नीटनेटके दिसत आहे. व्हिडीओत जपानचे चाहते स्टेडियम स्वच्छ करताना दिसतात. या पोस्टनंतर जपानच्या चाहत्यांचे सोशल मीडियावर मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.
ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंनी आपली खोली स्वच्छ केली. त्यानंतर अरबी भाषेत थँक्यू नोट्स लिहिली. फिफाने यावर लिहिले, ‘जर्मनीवरील विजयानंतर जपानच्या चाहत्यांनी स्टेडियम स्वच्छ केले. चार वर्षांआधीही जपानच्या चाहत्यांनी स्टेडियममधील कचरा उचलला होता. २०१८ ला रशियात झालेल्या विश्वचषकात जपान संघ २-३ने पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी सफाई केली होती.