FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सीनेमेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात शानदार गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मेस्सीच्या गोलने चाहत्यांची मने जिंकली होती, तर आता तो वादात अडकल्याचे दिसत आहे. सामना संपल्यानंतर खेळाडूंनी अर्जेंटिनाच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप सेलिब्रेशन केले, पण सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये मेस्सीच्या समोरच मेक्सिकोची जर्सी जमिनीवर पडल्याचे दिसून येते आणि सेलिब्रेशनदरम्यान मेस्सी खाली बसताच त्याचा पाय मेक्सिकोच्या जर्सीत अडकला. अशा परिस्थितीत फुटबॉलपटूने जर्सीवरून पाय काढला आणि नंतर जर्सी फेकून दिली.
मेस्सीचे हे कृत्य पाहून मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझ दुखावला असून त्याने ट्विटरवर आपले मत व्यक्त केले आहे. कॅनेलो म्हणाला, 'मेस्सी मेक्सिकोची जर्सी घालून फरशी साफ करत आहे. हे मेक्सिकन लोकांचा अनादर करणारे आहे. तो माझ्यासमोर येऊ नये म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना करावी. मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो, तसंच मेस्सीनेही मेक्सिकोसाठी केलं पाहिजे. बॉक्सर कॅनेलो अल्वारेझचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
मेस्सीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरं तर, मॅचनंतर मेस्सीने मेक्सिकन खेळाडूसोबत आपली जर्सी बदलली. त्याचवेळी लॉकर रूममध्ये अशी घटना घडली. मेस्सीचा पाय चुकून जमिनीवर पडलेल्या जर्सीवर पडला असे मानले जात आहे. अर्जेंटिनाचा माजी फॉरवर्ड सर्जियो अग्युरो मेस्सीच्या समर्थनार्थ पुढे आला असून त्याने कोणाला दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता, ही केवळ नकळत झालेली चूक असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"