Fifa World Cup 2022: ब्राझीलचा क्रोएशियाने पेनल्टी शूट आऊटवर ४-२ असा धुव्वा उडवल्यानंतर फुटबॉल चाहत्यांचे लक्ष ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालविरुद्ध मोरोक्कोच्या सामन्याकडे लागले होते. मात्र, ब्राझीलनंतर बलाढ्य पोर्तुगाल संघालाही पराभवाचा धक्का बसला. मोरोक्कोने त्यांचा १-० असा पराभव करीत केला उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आजच्या लढतीत पोर्तुगाल संघ स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सुरुवातीला बाकावर बसवण्यात आले. याचा फटका पोर्तुगालच्या संघाला सुरुवातीलाच बसला. मोरोक्कोच्या युसुफ एन नेसरीने ४२ व्या मिनिटावर हेडने अप्रतिम गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ५० व्या मिनिटाला पोर्तुगाल संघाने रोनाल्डोला मैदानात उतरवले.
रोनाल्डो लढला, पण सामना वाचवू शकला नाही
रोनाल्डो मैदानात दाखल होताच पहिल्याच मिनिटाला डाव्या बाजूने पास देताना गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र, मोरोक्कोच्या संघाने उत्तम बचाव केला. वेळ पुढे जात होती, तशी पोर्तुगालच्या चाहत्यांची धाकधूक वाढत होती. ८२ व्या मिनिटाला फेलिक्सने बरोबरीचा गोल केलाच होता. पण मोरोक्कोच्या गोलरक्षकाने तो रोखला. या सामन्याला अतिरिक्त वेळ मिळाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला रोनाल्डोकडून गोल करण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोरक्कोच्या गोलरक्षकाने गोल रोखला आणि कमाल केली. अतिरिक्त वेळेच्या ७ व्या मिनिटाला पोर्तुगालने पुन्हा एकदा गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेपेने ती संधी गमावली. त्यामुळे मोरोक्कोची आघाडी कायम राहून मोरोक्कोने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. यापूर्वी, १९९० मध्ये कॅमेरून संघाने, २००२ मध्ये सेनेगल तर २०१० मध्ये घाना संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच मोरोक्को आणि पोर्तुगाल यांच्यात फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा तिसरा सामना होता. यापूर्वी १९८६ मध्ये ग्रुप स्टेजमध्ये मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध ३-१ असा विजय मिळवला होता. तर २०१८ मध्ये पोर्तुगालाने १-० अशी परतफेड केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"