दोहा : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरू होण्याआधी सेनेगलच्या मोहिमेला मोठा धक्का लागला आहे. स्टार फुटबॉलपटू सादियो माने याच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याला रविवारपासून रंगणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही. बायर्न म्युनिख आणि सेनेगल फुटबॉल महासंघाने शुक्रवारी ही माहिती दिली.३० वर्षीय मानेच्या उजव्या पायावर शुक्रवारी रात्री ऑस्ट्रिया येथील इन्सब्रुक येथे शस्त्रक्रिया झाली. जर्मन लीगमध्ये ८ नोव्हेंबरला वेडर ब्रेमेनविरुद्ध झालेल्या सामन्यात मानेच्या पायाला दुखापत झाली होती. बायर्न म्युनिखने माहिती दिली की, ‘एफसी बायर्नच्या आघाडीच्या फळीतील माने विश्वचषक स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. पुढील काही दिवस तो म्युनिख येथे दुखापतीतून सावरण्यास सुरुवात करेल.’ सेनेगल संघाचे डॉ. मॅन्युएल अफोन्सो यांनी याआधी आशा व्यक्त केली होती की, विश्वचषकातील काही सामन्यांत माने सेनेगलकडून खेळेल; पण आता ही शक्यता संपुष्टात आली आहे.
FIFA World Cup 2022: सेनेगलला धक्का; माने विश्वचषकाला मुकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 6:32 AM