अल रयान (कतार) : दक्षिण कोरिया संघाने केलेल्या भक्कम बचावापुढे निष्प्रभ ठरलेल्या दक्षिण अमेरिकेतील बलाढ्य संघ उरुग्वेला गोल करता आला नाही. यामुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ह’ गटात सलामी सामन्यात दक्षिण कोरिया-उरुग्वे यांना ०-० अशा गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले.
दोन्ही संघांच्या बचावफळीने सामन्यात लक्षवेधी खेळ करताना प्रतिस्पर्धी आक्रमण रोखले. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या उरुग्वेसाठी ही बरोबरी काहीशी धक्कादायक ठरली. विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेला आठव्यांदा गोलशून्य बरोबरीवर समाधान मानले. केवळ इंग्लंड (११) आणि ब्राझील (९) हेच संघ याबाबतीत उरुग्वेहून पुढे आहेत.
संपूर्ण सामन्यात चेंडूवर ५६ टक्के नियंत्रण मिळवूनही उरुग्वेला गोल करण्यात अपयश आले. त्यांच्याकडून अनेक चुकाही झाल्या. गोल करण्याच्या तब्बल दहा संधी निर्माण केल्यानंतर केवळ एकदाच त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला. त्यातही दोनवेळा चेंडू गोलपोस्टला लागून परतल्याचे दु:ख त्यांना अधिक सलत असेल. आक्रमक फळीचे अपयश उरुग्वेसाठी महागडे ठरले.