अल वाकराह (कतार) : ब्रील एंबोलो याने केलेल्या सामन्यातील एकमेव गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फिफा फुटबॉल विश्वचषकात ‘जी’ गटातून विजयी सुरुवात करताना कॅमरुनला १-० असे नमवले. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच एंबोलोने निर्णायक गोल करत स्वित्झर्लंडचा विजय साकारला.स्वित्झर्लंडला विश्वविजेतेपद पटकावण्याची संधी असल्याचे मानले जात असले, तरी कॅमरुनने त्यांना पहिल्या सत्रात चांगलेच झुंजवले. त्यांनी गोल करण्याच्या काही शानदार संधी निर्माण करत स्वित्झर्लंडला दबावात ठेवले. पहिले सत्र बरोबरीत सुटल्यानंतर मात्र स्वित्झर्लंडने आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला एंबोलोने मिले शेरडन शकीरीकडून मिळालेल्या अप्रतिम पासवर चेंडू गोलजाळ्यात धाडला. या निर्णायक आघाडीनंतर स्वित्झर्लंडने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या; मात्र त्यांना कॅमरुनचा बचाव भेदता आला नाही.
s स्वित्झर्लंडने विश्वचषक स्पर्धेत केवळ दुसऱ्यांदा आफ्रिकन देशाविरुद्ध सामना खेळला. स्वित्झर्लंड विश्वचषक स्पर्धेत १९६६ नंतर सलग सहाव्या सलामी सामन्यात अपराजित राहिले. विश्वचषक स्पर्धेत कॅमरुनचा सलग आठवा पराभव. ब्रील एंबोलोने स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्त्व करताना सलग तिसऱ्या सामन्यात गोल केला. मध्यरक्षक रेमो फ्र्युलरने स्वित्झर्लंडकडून ५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
म्हणून गोलचा जल्लोष नाही!सामन्यातील निर्णायक गोल केल्यानंतर एंबोलोने गोल केल्याचा जल्लोष केला नाही. याला कारण म्हणजे त्याने दिलेले वचन. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एंबोलोने सांगितले होते की, ‘ज्या देशात माझा जन्म झाला आहे, त्या देशाविरुद्ध गोल केला, तर मी आनंद साजरा करणार नाही.’ त्यामुळेच त्याने गोल केल्यानंतर जेव्हा संघ सहकारी त्याच्याकडे आले तेव्हा एंबोलोने स्वत:चा चेहरा हातांनी झाकून घेतला. यानंतर त्याने स्वित्झर्लंड आणि कॅमरुनच्या चाहत्यांना अभिवादन केले. एंबोलो पाच वर्षांचा असतानाच त्याच्या कुटुंबीयांनी कॅमरुन सोडले होते. त्याचे कुटुंबीय आधी फ्रान्स आणि त्यानंतर स्वित्झर्लंडला स्थायिक झाले.