ब्रुसेल्स - कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. दरम्यान, या वर्ल्डकपमधील साखळी फेरीत बलाढ्य बेल्जियमला मोरक्कोकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बेल्जियमच्या राजधानीमध्ये हिंसेसा आगडोंब उसळला आहे. संतप्त जमावाने अनेक इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्सना आग लावली. रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार स्थानिक पोलिसांनी डझनभर लोकांना तब्यात घेतले आहे. हे सर्वजण दंलग नियंत्रणासाठी तैनात पोलिसांशी भिडले होते. ब्रुसेल्समधील अनेक ठिकाणी दंगल भडकल्याचे दिसत होते. दंगेखोरांना शांत करताना पोलिसांची कसोटी लागत होती.
या हिंसाचाराबाबत पोलिसांचे प्रवक्ते इलसे वान डी किरे यांनी सांगितले की, संध्याकाळी ७च्या सुमारास शांतता प्रस्थापित झाली. आता संवेदनशील भागात पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून गस्त सुरू आहे. सध्या पोलीस सातत्याने संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडूनही पोलिसांचे एक पथक सातत्याने चौकशी करत आहे. त्यामुळे दंगलीचे स्पष्ट कारण आणि कट रचणाऱ्याची माहिती घेतली जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंगेखोर आतिषबाजीचं सामान आणि काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांच्याकडे ज्वालाग्राही सामुग्रीही होती. तिच्या मदतीने त्यांनी अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले होते. पोलिसांनी सांगितले की, या आतिषबाजीमुळे एका पत्रकाराच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली. सातत्याने वाढत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वॉटर कॅनन तैनात केले आहेत. त्यानंतर स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.