Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. दोन वेळच्या ( १९७८ व १९८६) वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिनावर त्यांनी पिछाडीवरून विजय मिळवला. कतारमध्ये आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत यजमानांसह इराण या आशियाई संघाना हार मानावी लागली होती. त्यामुळे सौदी अरेबियाकडून फार कोणी अपेक्षा ठेवली नव्हती, परंतु त्यांनी चमत्कार केला आणि लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. सौदी अरेबियाच्या बचावाला आज तोड नव्हता आणि अर्जेंटिनाला काही केल्या बरोबरीचा गोल करता आला नाही.
लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर अर्जेंटिलाना १०व्या मिनाटाला१-० अशी आघाडी मिळवून दिली. सौदी अरेबियाचे खेळाडू रेफरीच्या निर्णयावर नाखूश दिसले. चार वर्ल्ड कप स्पर्धेत ( २००६, २०१४, २०१८ व २०२२) अर्जेंटिनाकडून गोल करणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू, तर जगभरातील पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी पेले, उवे सीलर, मिरोस्लाव्ह क्लोस व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी अशी कामगिरी केली आहे. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखताना १-० अशी आघाडी मिळवली. सौदी अरेबियाचा बचाव चांगला राहिला. दुसऱ्या हाफमध्ये सौदी अऱेबियाच्या सालेह अलशेहरीने ( ४८ मि.) गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ५३व्या मिनिटाला सालेम अलदावसारीने १८ यार्डाच्या बॉक्सच्या कोपऱ्यावरून अर्जेंटिनाच्या बचावपटूंना चकवून भन्नाट गोल केला. सौदी अरेबियाने २-१ अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्या चाहत्यांना धक्का दिला. आता अर्जेंटिनाची बरोबरी मिळवण्याची धडपड सुरू झाली आणि मेस्सी, मारिया जोडी सक्रिय झाली. १९७८ व १९८६च्या वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतीत ब्राझिल ( ५) व उरुग्वे ( २) यांच्यानंतर सर्वाधिक जेतेपद पटकावणारा संघ आहे. ६३व्या मिनिटाला निकोलास टग्लिफिकोने गोलपोस्टच्या जवळून चेंडू जाळीच्या दिशेने पाठवलाच होता, परंतु सौदी अरेबियचा गोलरक्षक मोहम्मद अलोवैसने चतुराईने तो गोल अडवला. अर्जेंटियन फॅन्सला यावर विश्वासच बसेना. ८०व्या मिनिटाला मेस्सीने फ्री किकवर गोल करण्याची संधी गमावली. ८४व्या मिनिटाला मेस्सीचा हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न अरेबियन गोलरक्षकाने रोखला. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत अर्जेंटिनाकडून जोरदार प्रयत्न झाले, परंतु अरेबियन बचाव त्यांना भेदता येत नव्हता. ९०+१ मिनिटाला गोलरक्षाने चेंडू रोखल्यानंतर रिटर्न फिरला अन् अर्जेटिनाच्या खेळाडूने तो पुन्हा जाळीच्या दिशेने पाठवला. मात्र, अरेबियन खेळाडूने हेडरने तो गोल रोखला. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नता सौदी अरेबियाच्या गोलरक्षकाचा गुडघा त्यांच्याच खेळाडूच्या बचावपटूवर जोरदार आदळला अन् खेळाडू जमिनिवरच आडवा पडला.