कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजल्यापासून पाहता येणार आहे. दोहाच्या लुसैल स्टेडियममध्ये फायनलची लढत रंगणार आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहेत.
फ्रान्सनं मोरक्को आणि अर्जेंटिनानं क्रोएशियावर मात करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र फायनल सामन्याआधी फ्रान्स संघाची चिंता वाढली आहे. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रान्स संघात व्हायरसच्या घुसखोरीमुळे अनेक प्रमुख खेळाडू आजारी पडले आहेत. व्हेरनमध्ये सौम्य लक्षणे आहेत, परंतु इब्राहिमा कोनाटे दिवसभर त्याच्या खोलीतच राहिला.
फक्त काही तास उरले; उपविजेत्या संघाला मिळणार तब्बल २४८ कोटी रुपये; विजेत्याला त्याहून...
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला सामोरे जाणे फ्रान्ससाठी सोपे नाही आणि त्यांच्यासाठी हे आव्हान खेळाडूंच्या फिटनेसमुळे आणखी कठीण झाले आहे. खेळाडूंच्या प्रकृतीबाबत फ्रान्स आधीच तणावात आहे. अंतिम सामन्यापूर्वीच संघाचा आणखी एक बचावपटू डेएट उपमेकानो, मिडफिल्डर ॲड्रियन रॅबिओ आणि विंगर किंग्सले कोमन हेदेखील आजारी आहेत.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा संघ विजेतेपदासह करोडो रुपये घेऊन जाईल. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघ देखील मालामाल होणार आहे.फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात विजेता होणाऱ्या संघाला ३४७ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. तर उप-विजेता संघाला २४८ कोटी रुपये दिले जाणार आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला २२३ कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को २०६ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.
आमने-सामने
रविवारचा सामना या उभय संघांमधील १३ वा सामना असेल. याआधीच्या १२ सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने सहा वेळा बाजी मारली, फ्रान्स तीन वेळा विजेता ठरला, तर तीन सामने बरोबरीत सुटले. विश्वचषकात ही चौथी लढत ठरेल. १९३० मधील स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सला १-० असे पराभूत केले होते. १९७८ मध्ये अर्जेंटिनाने २-१ अशी बाजी मारली होती. २०१८ मध्ये हे संघ तिसऱ्यांदा आमने-सामने आले; पण बाद फेरीतील या दोघांमधली ती पहिलीच लढत होती, जी फ्रान्सने ४-३ अशी जिंकली.
१८ कॅरेट सोन्याचा वापर
फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास ६.१७५ किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी ३६.८ सेंटीमीटर आणि व्यास १३ सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. १९९४ साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली. फायनलमध्ये विजेत्या संघाला ३४७ कोटी आणि उपविजेत्या संघाला २४८ कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"