Fifa World Cup Final 2022 Live Updates : फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला १ मिनिट व ३७ सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त ३० मिनिटांत गेला. पहिली १५ मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने १०८व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने पुन्हा सामना फिरवला. अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. ९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू आज गोलसाठी भूकेला दिसला. फ्रान्सच्या बचावपटूंना आज निवांत श्वास घ्यायलाच दिला जात नव्हता. कधीही डिफेन्सीव्ह खेळावर भर न देणाऱ्या फ्रान्सला आज अर्जेंटिनाच्या पवित्र्यामुळे कोशात जावे लागले.१९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. २१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला.
सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले.
दुसऱ्या हाफमध्येही अर्जेंटिनाचा तोच पवित्रा दिसला अन् ४८व्या मिनिटाला त्यांच्याकडून आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला. मेस्सीने चेंडूवर ताबा राखताना फ्रान्सच्या बचावपटूंचा छळ करणं सुरूच ठेवलं होतं. फ्रान्सकडून आता धक्काबुक्कीचा खेळ सुरू झाला आणि त्यात अर्जेंटिनाचे खेळाडू जखमी झालेले दिसले. पण, त्यांचा आज निर्धार पक्का होता. आक्रमणाची धुरा अलव्हारेज व मेस्सीने सक्षमपणे सांभाळली होती, तर बचावात डी मारिया, ख्रिस्टीयन रोमेरियो आदी उल्लेखनीय खेळ करताना दिसले. मेस्सी व अलव्हारेझ यांना रोखणे फ्रान्सच्या खेळाडूच्या हाताबाहेरचे होते. त्यांच्याकडून सातत्याने गोल प्रयत्न झाले, परंतु चेंडू यावेळेस पोस्ट शेजारून गेला.
डी मारियाला ६४व्या मिनिटाला रिप्लेस केले गेले आणि या अनुभवी खेळाडूने मैदानाबाहेर जाताना चाहत्यांना अभिवादन केले. त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. फ्रान्स आज अर्जेंटिनाच्या तुलनेत कुठेच दिसले नाही. ऑलिव्हर जिरून, ग्रिएझमन या स्टार खेळाडूंना रिप्लेस करून फ्रान्स कोणती रणनीत आखत होते, हेत समजेनासे झाले. ७९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एमबाप्पेने गोल करून फ्रान्सच्या चाहत्यांना जागं केलं... अखेरच्या १० मिनिटांत आता खरी लढत सुरू झाली. ८१व्या मिनिटाला एमबाप्पेने अर्जेंटिनाची बचावभींत भेदली अन् सामना २-२ असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला...
सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.